Wednesday, 24 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या २८, १९, ३० आणि ३१)

।। श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या: 

भिकाऱ्यापासीं मागतां भिक्षा। दीक्षाहीनापासीं दीक्षा। 

उजेड पाहतां कृष्णपक्ष। पाविजे कैंचा ।।२८।। 

अबद्धापासीं गेला अबद्ध। तो कैसेनि होईल सुबद्ध। 

बद्धास भेटतां बद्ध। सिद्ध नव्हे।। २९।। 

देहापासीं गेला देही। तो कैसेनि होईल विदेही। 

म्हणौनि ज्ञात्यावांचून नाहीं। ज्ञानमार्ग।। ३०।। 

याकारणें ज्ञाता पाहावा। त्याचा अनुग्रह द्यावा। 

सारासार विचारें जीवा। मोक्ष प्राप्त ।।३१।। 

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्टे दशके देवशोधनाम समास पहिला ।।१।।


मराठी अर्थ:

भिकाऱ्याकडे जाऊन भिक्षा मागणे, असंप्रदायिक मनुष्याकडून दीक्षा घेणे आणि कृष्णपक्षात प्रकाशाची अपेक्षा करणे; या गोष्टी निरर्थर आहेत. (२८)

स्वैराचारी (मनाला वाटेल तसा वागणारा) माणसाला जर दुसरा स्वैराचारी भेटेल तर तर तो कधी शिस्तीने वागेल काय? तसाच बद्धाजवळ जर सिद्ध होण्याच्या अपेक्षेने दुसरा बद्ध जाईल तर तो सिद्ध होऊ शकणार नाही. (२९)

देहबुद्धी असलेल्यापाशी दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो विदेहमुक्त कसा होऊ शकेल? म्हणूनच ज्ञानी मनुष्याशिवाय ज्ञानमार्ग कुठेही मिळणार नाही. (३०)

याचसाठी ज्ञानी मनुष्याचा शोध घ्यावा आणि त्याच्याजवळून अनुग्रह (कृपेसाठी दिली जाणारी दीक्षा.) घ्यावा. नंतर सारासार विचार करत राहून जिवाला मोक्ष मिळतो. (३१) ।। श्री राम ।। 

सार्थ दासबोधाच्या सहाव्या दशकामधील देवाचा शोध नावाचा पहिला समास समाप्त झाला. 


दशक ६ समास १ समाप्त. 

Share:

Tuesday, 23 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या २६ आणि २७)

                                                                    ।।श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या:
रोग्यापासीं रोगी गेला। तेथें कैंचें आरोग्य त्याला। 
निर्बलपासीं निर्बळाला। पाठी कैंची ।।२६।। 

पिशाच्यापासीं पिशाच्य गेलें। तेथें कोण सार्थक जालें। 
उन्मत्तास उन्मत्त भेटलें। त्यास उमजवी कवणु ।।२७।। 

मराठी अर्थ:
आजारी मनुष्य आरोग्यासाठी दुसऱ्या रोग्याकडे जाईल तर तो कधी निरोगी होईल काय? किंवा एक दुर्बल जर का दुसऱ्या दुर्बळापाशी गेला तर त्याचे संरक्षण कसे बरे होईल. (२६)

पिशाचापाशी दुसरे पिशाच गेले तर कसला उद्धार होणार? एका उन्मत्ताला (मस्तवाल) दुसरा उन्मत्त भेटला तर समजूत कोण कुणाची काढणार? (२७)


Share:

Monday, 22 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या २४ आणि २५)

     ।।श्री राम समर्थ श्री राम ।।

ओव्या: 
ऐसें जयापासीं ज्ञान। तोचि जाणावा सज्जन।
तयापासीं समाधान। पुसलें पाहिजें।। २४।। 

अज्ञानास भेटतां अज्ञान। तेथें कैंचें सांपडेल ज्ञान। 
करंट्यास करंट्याचे दर्शन। होतां भाग्य कैंचें ।।२५।।

मराठी अर्थ:
असे ज्ञान ज्याच्याजवळ असेल तोच खरा सज्जन असतो आणि त्याच्यापाशी जाऊनच समाधानाचा शोध घेतला पाहिजे. (२४)

अज्ञानी माणसाकडे जर दुसरा अज्ञानी मनुष्य ज्ञानप्राप्तीकरता जाईल तर ज्ञान कसे मिळेल बरे? 
करंटा (दुर्भागी, कमनशिबी) मनुष्य जर दुसऱ्या करंट्यापाशी गेला तर त्याचे भाग्य कधी उजळेल काय? (२५)


Share:

Sunday, 21 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या २१,२२ आणि २३)

    ।।श्री राम समर्थ श्री राम ।।

ओव्या: 
देव वोळखावा येक। तेंचि ज्ञान तें सार्थक। 
येर अवघेंचि निरार्थक। पोट विद्या ।।२१।। 

जन्मवरी पोट भरिलें। देहाचें संरक्षण केलें। 
पुढें अवघेंचि वेर्थ गेलें। अंतकाळीं ।।२२।। 

येवं पोट भराव्याची विद्या। तयेसी म्हणों नये सद्विद्या। 
सर्वव्यापक वस्तु सद्या। पाविजे तें ज्ञान ।।२३।। 

मराठी अर्थ:
एकमेव देव ओळखणे हेच ज्ञान सार्थक करणारे असते, इतर सर्व केवळ पोट भरण्याच्या विद्या असून त्या निरर्थक आहेत. (२१)

संपूर्ण जन्म पोटासाठी खटाटोप करण्यात गेला आणि शरीर पोसण्यातच खर्ची घातला तर अंतकाळी पुढे ते सर्वच व्यर्थ जाणारे आहे. (२२)

तात्पर्य असे की, प्रपंच चालवून पोट भरायची जी विद्या तीच सद्विद्या अशी समजूत करून घेऊ नये तर कणाकणाला व्यापून राहाणारे जे तत्व आहे ते "याचि देही याचि डोळा" प्राप्त करून घेणे हेच खरे ज्ञान होय. (२३)


Share:

Saturday, 20 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या १९ आणि २०)

   ।।श्री राम समर्थ श्री राम ।।

ओव्या:

जाणिजे परमात्मा निर्गुण। त्यासीच म्हणावे ज्ञान। 

त्यावेगळें तें अज्ञान। सर्व कांहीं ।। १९।। 

पोट भाराव्याकारणें। नाना विद्या अभ्यास करणें। 

त्यासी ज्ञान म्हणती परी तेणें। सार्थक नव्हे ।।२०।। 

मराठी अर्थ:

निर्गुण परमात्म्याला जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे. त्याव्यक्तरिक्त जे-जे काही आपण जाणतो असे वाटत असते, ते खरे अज्ञानच असते. (१९)

प्रपंच चालवता येऊन पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी अनेकानेक विद्या व कला यांचा अभ्यास केला जातो व त्याला ज्ञान म्हणतात. परंतु त्या ज्ञानामुळे जीवनाचे सार्थक होत नसते. (२२)



Share:

Friday, 19 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या १७ आणि १८)

  ।।श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या:
चळेना ढळेना देव। ऐसा ज्याचा अंतर्भाव। 
तोचि जाणिजे महानुभाव। संत साधू ।।१७।। 

जो जनामधें वागे। परि जनावेगळी गोष्टी सांगे। 
त्याचे अंतरीं ज्ञान जागे। तोचि साधु ।।१८।। 

मराठी अर्थ:
संत, साधू किंवा महात्मा हा अचल, अजर, अमर अशा देवाला अंतर्यामी जाणत असतो. (१७)

असा महात्मा हा कुठे अवघड जागी राहत नसून तो लोकांमध्येच राहून लाकांसारखाच वागतो. पण त्याच्या अंतरात ज्ञान प्रकट झालेले असल्यामुळे तो लोकांप्रमाणे सांसारिक चर्चा न करता काही वेगळ्याच मार्गाचा उपदेश करतो. (१८)


Share:

Thursday, 18 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या १५ आणि १६)

 ।।श्री राम समर्थ श्री राम ।।

ओव्या:  
म्हणौनि देव वोळखावा। जन्म सार्थकचि करावा। 
न कळे तरी सत्संग धरावा। म्हणिजे कळे ।।१५।। 

जो जाणेल भगवंत। तया नाव बोलिजे संत। 
जो शाश्वत आणि अशाश्वत। निवाडा करी ।। १६ ।।

मराठी अर्थ: 

म्हणून याच कारणासाठी देवाचा साक्षात्कार करून घ्यावा व जन्मास आल्याचे सार्थक करावे. आता याकरिता काय करावे हे जर कळत नसेल तर सत्संग (आत्मसाक्षत्कार झालेल्या सत्पुरुषांचा सहवास) धरावा, त्यामुळे कळू लागेल. (१५)

जो भगवंताला प्रत्यक्ष जाणत असतो तोच संत असे म्हटले आहे. तोच फक्त शाश्वत (अक्षय, कमीजास्त न होणारे) आणि अशाश्वत (नाशिवंत) हे वेगवेगळे करू शकतो. (१६) 
Share:

Wednesday, 17 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या १३ आणि १४)

 ।।श्री राम समर्थ श्री राम ।।

ओव्या:
तो देव ठाई पडेना। तरी येमयातना चुकेना। 
ब्रह्मांडनायेक चोजवेना। हें बरे नव्हे।। १३।। 

जेणें संसारी घातलें। आवघें ब्रह्मांड निर्माण केलें। 
त्यासी नाहीं वोळखिलें " तोचि पतित ।।१४।। 

मराठी अर्थ:
कारण जोपर्यंत त्याची प्राप्ती होणार नाही, तोपर्यंत यमयातना काही चुकणार नाहीत. अखिल ब्रह्मांडाच्या स्वामीला जर भेटू शकणार नसू, तर ते काही चांगले नव्हे (१३)

आपणास संसारात घालणाऱ्या, सर्व ब्रह्मांडे निर्माण करणाऱ्या परमेश्वराला जो जाणतच नसतो, तोच खरोखरीच पापी असतो. (१४)


Share:

दशक ६ : समास १ (ओव्या ११ आणि १२)

।।श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या:
असो ऐसियां समस्तां। येक ब्रह्मा निर्माणकर्ता। 
त्या ब्रह्मायासहि निर्मिता। कोण आहे ।।११।। 

ब्रह्मा विष्णु आणि हर। त्यांसी निर्मिता तोचि थोर। 
तो ओळखावा परमेश्वर। नाना येत्नें।। १२।। 

मराठी अर्थ:
असे अनेक चक्रवर्ती निर्माण करणारा जो एकटा ब्रह्मदेव आहे, त्यालाही जन्मास घालणारा कोण असावा बरे? (११)

ब्रह्मदेव, विष्णू व महादेव यांनाही ज्याने उत्पन्न केले आहे तोच सर्वांत श्रेष्ठ असला पाहिजे. तेव्हा कितीही प्रयत्न करावे लागले तरी त्याला जाणून घ्यावे लागेल. (१२)


Share:

Tuesday, 16 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या ८, ९ आणि १०)

 ।।श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या: 

ग्रामीं थोर ग्रामाधिपती। त्याहूनि थोर देशाधिपती। 

देशाधिपतीहुनि नृपती। थोर जाणावा ।।८।। 

राष्ट्रांचा प्रभू तो राजा। बहुराष्ट्र तो माहाराजा। 

माहाराजांचाहि राजा। तो चक्रवर्ती। थोर राजा ।।९।। 

येक नरपति येक गजपती। येक हयपती येक भूपती। 

सकळांमध्ये चक्रवर्ती। थोर राजा ।। १०।। 

मराठी अर्थ:

गावचा प्रमुख पाटील असतो, त्याच्यापेक्षा थोर जिल्हाधिकारी असतो, त्याच्याहून थोर राजा (सध्याच्या लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री) असतो असे जाणावे. (८)

त्या राजापेक्षा श्रेष्ठ सम्राट (पंतप्रधान) असतो व सम्राटापेक्षाही थोर चक्रवर्ती असतो, अनेक सम्राट त्याचे मांडलिक असतात. (९)

अशा मांडलिकांपैकी काही जणांकडे सैन्यबळ असते, तर कुणापाशी गजदल, अश्वदल असते. कुणापाशी फार मोठे राज्य असते. पण या सर्वांवर चक्रवर्तीचा अधिकार चालतो. (१०)



Share:

Monday, 15 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या ६ आणि ७)

।।श्री राम समर्थ श्री राम ।।

ओव्या :

त्यास न भेटतां त्याचे नगरीं। राहातां धरितील बेगारी। 

तेथे न करितां चोरी। आंगीं लागे। ।।६।। 

या कारणें जो शाहाणा। तेणें प्रभूसी भेटावें जाणा। 

ऐसें न करितां दैन्यवाणा। संसार त्याचा ।।७।। 

मराठी अर्थ : 

अधिकाऱ्याला न भेटता जर त्याच्या अधिकारी क्षेत्रात जाऊन राहिलो तर आपणास उपरा समजतील व तिथे चोरी झाली तर निरपराधी असलो तरी आळ आपल्यावर घेतील. (६)

त्यामुळे, जो हुशार असेल त्याने प्रमुख अधिकाऱ्याची संमती आधी घेतली पाहिजे. जर तो असे न करील तर त्याचा संसार सुखाचा होणार नाही. (७)



Share:

Sunday, 14 January 2024

दशक ६ : समास १ : देवशोधन (ओव्या ३ ते ५)

।।श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या :

म्हणौन ज्यास जेथें राहाणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें।
म्हणजे होये श्र्लाघ्यवाणे । सर्व कांहीं ।। ३ ।।

प्रभूची भेटी न घेतां । तेंथें कैंची मान्यता ।
आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ।। ४।। 

म्हणौनि रायापासूनि रंक । कोणी येक तरी नायेक । 
त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ।। ५।।  


मराठी अर्थ :

म्हणनूच ज्याला जिथे राहायचे असेल त्याने तिथल्या प्रमुख अधिकाऱ्याची भेट घेऊन आपला हेतू सांगून जर तिथे राहिला तर मग तिथला त्याचा रहिवास निर्वेध  होतो. (३ )

तशी भेट न घेता राहिल्यास ते राहाणे अनधिकृत ठरेल व मान्यता नसल्यामुळे आपले महत्व उरणार नाही. (४)

म्हणून कुणी एक जो मुख्य अधिकारी असेल, त्याला भेटणे आवश्यक असते, मग तो राजा असो व सामान्य नागरिक असो. जो विवेकी (सारासार विचहर करणारा) असतो तोच फक्त ही गोष्ट जाणतो. (५)

Share:

Saturday, 13 January 2024

दशक ६ : समास १ : देवशोधन (ओव्या १ आणि २)

 दशक ६ : समास १ : देवशोधन 

पाच ओव्या अर्थासहित.  

।। श्रीराम ।। 

चित्त सूचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावे । 
सावध होऊन बैसावें । निमीष्य येक ।। १।। 

कोणी येके ग्रामीं अथवा देसीं ।  राहाणें आहे आपणासी ।
न भेटतां तेथिल्या प्रभूसी  । सौख्य कैचें ।। २ ।। 


 
मराठी अर्थ: 

।। श्रीराम ।। 

श्रोते हो, क्षणभर सावधान होऊन बसा व चित्त एकाग्र करून, मी आत्ता पर्यंत जे सांगितले आहे ते मनात नीट साठवून ठेवा. (१)

असे पाहा की, जर आपल्याला एखाद्या गावात अगर प्रांतात वस्ती करायची असली व आपण त्या ठिकाणच्या मुख्य (शासक) अधिकाऱ्याची भेट घेऊन त्याची संमती न घेता राहिलो तर ते राहणे सुखाचे होणार नाही. (२)


Share: